ओढ

odh

तु जणू पौर्णिमेचा चंद्र, तेजस्वी आणि लख्ख प्रकाशित. नेहमीच असंख्य तारे तारकांनी घेरलेला. आणि मी दूर अंतरावर रात्रीच्या काळोखात तुझ्या आठवणीत खळखळणारा एक अशांत समुद्र. रोज मनात तुझ्या भेटीची आस घेऊन भरती ओहोटीचा खेळ खेळणारा आणि त्या खेळात स्वतःलाच अस्वस्थ करून घेणारा तुझा मित्र. ज्या दिवशी तुझ्या अस्तित्वाची जाणीव झाली तेव्हापासून, अगदी त्या क्षणापासून मला तुझी जी ओढ लागली ती अजूनही तशीच आहे. आणि ह्यापुढेही राहील. माझा भरती-ओहोटीचा खेळ ह्याची नेहमी तुला साक्ष देत राहील.

आपली भेट होणं शक्य नाही. कधीच नव्हतं. पण मन वेडं असतं. वाटायचं कि दूर क्षितिजापलीकडे कुठेतरी तुझी-माझी भेट होईल. आपल्यातील अंतर अमाप पण इच्छा असेल तर कापण्यासारखं आहे असं वाटायचं. तुझा मंद निर्मळ प्रकाश मला आपल्यातील अंतर कमी करण्याची प्रेरणा द्यायचा. आजपर्यंत मी खूप प्रयत्न केलेत. तुझ्या जवळ येण्याचे, तुला बिलगण्याचे. माझ्या मनात तुझ्याविषयी असलेल्या भावना व्यक्त करण्याचे. तुला सगळं काही कळत होतं, हे मला माहित होतं. पौर्णिमेची रात्र ह्याचा पुरावा होती. तु तुझ्या किरणांनी मला स्पर्श करायचीस आणि आपल्यातील संवाद रात्रभर रंगायचा. ते क्षण अद्भुत होते. आपल्यात झालेले संवादही अविस्मरणीय होते.

अनेक वर्ष उलटली पण आपली भेट मात्र झाली नाही. आता सगळं हरवल्यासारखं वाटतं. बऱ्याच गोष्टी कळून चुकल्या. तुझा संवाद हा फक्त पौर्णिमेच्या रात्रीपुरता मर्यादित होता. तुझा निर्मळ प्रकाश माझ्यासाठी नसून तो फक्त तुझ्या सोबतीला असणाऱ्या ताऱ्यांसाठीच होता. जी काही ओढ होती ती फक्त माझ्या बाजूनेच होती.

आपल्या नात्याला पूर्णविराम देण्याची आता वेळ आली आहे. आपल्या दोघांमध्ये असलेली ही शांतता स्वतःमध्ये सामावून घेऊन मला लुप्त होऊन जायचंय. आता तुझ्या भेटीची आस नको. तुझ्या स्पर्शाचा मोह नको. जर काही राहणार आहे तर ती फक्त माझी तुझ्याबद्दलची ओढ.

नातं कुठलंही असो, त्यात ओढ असायला हवी. मनाला मनाची, जीवाला जीवाची आणि व्यक्तीला व्यक्तीची ओढ. बरं प्रेम आहे म्हणजे ओढही असेलच असे नाही. प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या वेगळी त्यामुळे असा ग्रह करणेही चुकीचे ठरेल. आजकाल कोणी आपल्या प्रेमात आहे कि नाही हे कळणे तर दूरच , पण आपण खरंच एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात आहोत का, हेही कळायला मार्ग नसतो. अश्या जटिल नात्यांच्या दुनियेत नाती जपायची असतील तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी.

ओढ असली तरच नातं टिकतं. ओढ संपली की नातंही तुटतं.

प्रतिक अक्कावार
Pratik Akkawar

Pratik Akkawar

I am occasionally a poet, blogger and an amateur writer, trying to put my thoughts into words and sometimes words into poems. Besides that, I am a day dreamer, lazy reader and patient listener. You live only once so, breath, smile, laugh and love. Thank you for passing by. Stay blessed. Cheers.

You may also like...

Leave a Reply

%d bloggers like this: